धडपडतो अन् तरी शोधतो
सुख अडगळीत आयुष्याच्या
भंगल्या स्वप्नांत जगतो,
छटा लपवूनी नैराश्याच्या
एक एक स्वप्न तयांतील
सांगतो कधी हसऱ्या कथा
कधी मधेच हसता हसता
जातो बोलूनी साऱ्या व्यथा
चटके सारे आयुष्याचे
हसता हसता सहज सोसतो
भंगल्या स्वप्नांतूनी मी
शहाणपण आज वेचतो
पसाऱ्यातूनी आयुष्याच्या
वाट शोधतो मी सुखाची
दु:खांच्या या काळोखातून
किरण शोधतो नवी उद्याची
थकला जरी हा जीव माझा
ओवाळून टाकतो कुणावर
जाती निघूनी ते ही क्षणात
घाव देवूनी खोल मनावर
दिले जरी आयुष्य तयांना
तरी न पाहती मागे वळूनी
निघूनी जाती असेच अलगद
खेळ भावनांसवे खेळूनी
सोडूनी जाती तरी जीव हा
तयांसाठी उगाच झुरतो
आठवणींचा पसाराच मग
एकाकी या मनात उरतो
- संचिता नितीन गड्डमवार
©sanchita gaddamwar
#Parchhai