जन्माला जन्माने द्यावा विठ्ठल विठ्ठल
जन्मा सोबत चालत यावा विठ्ठल विठ्ठल
तुझ्या नि माझ्या स्वप्नांचे हे घरटे आहे
या घरट्याचा खोपा व्हावा विठ्ठल विठ्ठल
एकच म्हणणे आहे या दोन्ही टाळांचे
की टाळांना कंठ फुटावा विठ्ठल विठ्ठल
कृष्णासाठी मोरपिसांची राधा झाली
अन राधेच्या ओठी पावा विठ्ठल विठ्ठल
अविरत वारी चालत जातो त्याच्यासाठी
पाउलवाटेवरती यावा विठ्ठल विठ्ठल
ओठांवरती तिच्या किती हे नाव असावे
अन ओठांनी अलगद प्यावा विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
या नावावर जन्म सरावा विठ्ठल विठ्ठल
-शशिकांत कोळी(शशी)
©Shashikant Koli
आषाढी एकादशी