शापित यक्ष...
शामलवर्णी अस्तर ओढून
गूढ नभाचे तेज लोपले
झरोक्यातूनी डोकावत का
अनोळखी मी बिंब गोपले..
उगां वाटते वठल्या झाडां
कधी तरी येईल पालवी
आस मनीची सुकते तेंव्हा
वसंत जेंव्हा गरळ कालवी..
कैक फुलांचे कैक ताटवे
स्वैर मुखाने दिशा चुंबिती
कोश पांघरूण खुळा भ्रमर तो
राग वीराणी सर गुंफिती..
विलुप्त झाल्या खुणा गहिऱ्या
मागमूस ना मातीला
आत कोंदला गंध कस्तुरी
कळ युगाची छातीला..
चमचमणारे मंद काजवे
भार पेलती नक्षत्रांचा
शापित यक्ष पैलतीरी मी
श्राप भोगतो आठवांचा..
©Shankar Kamble
#Blossom #शाप #एकाकी #कवी #मराठीकविता #शापित #सुमन #काव्य