शोध तुझे तू नवीन रस्ते विषय संपला
मला पाहिजे तसे जगू दे विषय संपला
कोकीळेसही भुरळ पडावी तुझ्या गळ्याने
माझे असु दे बेसूर गाणे विषय संपला
पत्र गुलाबी प्रेमाने पाठवा परंतू
उत्तर जर का नाही आले विषय संपला
छान तुझा संसार चालला ; कमी कशाची ?
तिच्या घरी ती मजेत आहे विषय संपला
रात्री अपरात्रीला येते फुटून दुखणे
रोज सकाळी जरी वाटते विषय संपला
त्रुटीत होती अडकुन फाइल महिनोमहिने
फक्त जरासे वजन ठेवले विषय संपला
वजीर गेला हत्ती घोडे प्यादे मेले
नंतर एका चेकमेटने विषय संपला
- अमोल बी शिरसाट
तू गेल्यावर कुणी मनाला तितके आता भावत नाही
तू गेल्यावर कुणी फारसे स्वप्नांचा तळ गाठत नाही
सजावटीच्या वस्तूंनी भरलेली खोली आत मनाच्या
त्यात एकटी एक बाहुली दार मनाचे उघडत नाही
बाप व्हाटस्अप- माय फेसबुक - चॅटींगच्या नादात लेकरे
भरलेले घर असूनसुद्धा कुणी कुणाशी बोलत नाही
संशय जेव्हा नात्यामध्ये रुजू लागतो कणाकणाने
अशा विषारी मातीमध्ये कधी बियाणे उगवत नाही
कसे बिचारे उंच भरारी हवेत घेइल खुल्या मनाने
नाजुकशा पंखांना इतके भारी दप्तर तोलत नाही
अमोल बी शिरसाट
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here